मिनी मंत्रालयाच्या 56 जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू

रत्नागिरी:- मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. एकूण 56 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 16 जानेवारी पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून इच्छुक उमेदवारांनी आतापासून आपली तयारी सुरू केली आहे.

निवडणूक विभागाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली. पहिल्या टप्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचा समावेश आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया काढण्यात आली होती. त्यात २८ गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के आरक्षणानुसार १५ जागा राखीव ठरविण्यात आल्या आहेत.

आरक्षित करण्यात आलेल्या सर्वसाधारण प्रवर्गात केळशी, कोतवडे, उमरोली, खालगाव, जालगाव, बाणकोट, कोळबांद्रे, भिंगरोळी, कोंसुंब, कडवई, गोळप, धामापूर-तर्फे-संगमेश्वर, वडदहसोळ, धोपेश्वर, दयाळ, कोकरे, आजगोली, दाभोळे, गवाणे आणि पावस या गटांचा समावेश आहे. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी कळवंडे, पेढे, धामणदेवी, साटवली, खेडशी, आसगे, वहाळ, खेर्डी, कसबा संगमेश्वर, भांबेड, मुचरी साखरीनाटे, कातळी, साडवली, सावर्डे, झाडगाव (म्यु. बाहेर) आणि वेळणेश्वर या गटांचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) मतदारसंघांमध्ये जुवाटी, कर्ला, पडवे, भडगाव, शृंगारतळी, सुकीवली आणि नाचणे यांचा समावेश आहे, तर ओबीसी महिला प्रवर्गात लोटे, कोंडकारुळ, भरणे, दाभोळ, शिरगाव, अलोरे, विराची वाडी आणि पालगड या गटांचा समावेश आहे. अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी हातखंबा, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी वाटड आणि अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी हर्णै या गटांची निवड झाली आहे.

मंगळवारी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधत कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांसोबत संपर्क करण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने आपल्याच पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.