रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. शहरात येणार्या प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पालिकेच्या कर्मचार्यांना दिल्या आहेत. शहरातील प्रत्येक व्यापार्यांना तसे पत्र दिले आहे. लग्न समारंभासह अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थितीबाबत मर्यादा घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास पालिकेचे कर्मचार्यांना संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेने ही कठोर पावले उचलली अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साळवी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत आपण संपूर्ण शहर सॅनिटाईझ केले होते. तसेच कडक नियमांची अंमलबजावणी केली. रुग्ण शहरात नियंत्रित ठेवण्यासाठी पालिका आणि आरोग्य विभागाने कसोशीने प्रयत्न होते. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता तो वाढला तर नियंत्रणात आणणे कठीण होईल. यासाठी आजपासून पालिकेचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीने मास्क न वापरणार्यावर कारवाई करून 500 रुपये दंड केला जाईल. शहरातील सर्व व्यापार्यांनाही पत्र दिली आहेत. येणार्या ग्राहकांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश द्यायचा आहे. मास्क नसेल तर प्रवेश देऊ नका, असे सांगितले आहे.
लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रमांना उपस्थितांसाठी मर्यादा घालून दिली आहे. त्यांच्यावर पालिकेच्या कर्मचार्यांचे लक्ष राहणार आहे. त्यांनी मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.यावेळी उपनगराध्यक्ष रोशन फाळके, राजन शेट्ये, निमेश नायर आदी उपस्थित होते.









