रत्नागिरी:- पाऊस लांबणीवर जाणे हे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी चिंताजनक असले तरी किनारी भागात बिगरयांत्रिकी नौकांच्या मासेमारीसाठी आणि गरवून मासे पकडणार्याना लाभदायक ठरत आहे. त्याचबरोबर पावसाळी मासेमारी बंदीकाळात बेकायदेशीरपणे समुद्रात मासेमारीसाठी जाणार्या यांत्रिकी नौकांनाही हे वातावरण पोषक आहे. त्याचवेळी बंदीकाळात यांत्रिकी नौका मासेमारीसाठी जाऊ नयेत यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून दक्षताही घेतली जात आहे.
पावसाळी मासेमारी बंदी 1 जूनपासून सुरू झाली आहे. 1 ऑगस्टपासून ही पावसाळी मासेमारी बंदी उठणार असली तरी मान्सून सुरू न झाल्याने बेकायदेशीरपणे समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणार्या नौकांना पोषक वातावरण आहे. जिल्ह्यात सुमारे 3 हजार 519 यांत्रिकी नौका आहेत. पावसाळी मासेमारी बंदी सुरू झाल्यानंतर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाने नौका मालकांसह मच्छिमार सहकारी संस्थाना पत्राद्वारे मासेमारी करण्यास न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मासळी उतरवण्याच्या केंद्रांवर फलक लावून बंदीकाळातील मासेमारीचा धोका पटवून दिला जात आहे.
‘सागर मित्र’ मच्छिमार सोसायट्यांच्या कार्यालयात जाऊन बंदीकाळात मासेमारी करण्यास जाऊ नये तसेच वादळी हवामानाचे संदेश देत आहेत. जिल्ह्यात 46 मासळी उतरवण्याची केंद्रे असून,
याठिकाणी मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी भेट देऊन पाहणी करत आहेत. सागरी सुरक्षा रक्षक या केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत.
ज्या यांत्रिकी नौका समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करण्याचा संशय आल्यास त्या नौकांना अडवले जात आहे. हा सर्व अहवाल छायाचित्रांसह रोजच्या रोज सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाकडून मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाला पाठवला जात आहे.









