मासेमारी व्यवसाय पुन्हा वातावरणातील बदलांच्या फेऱ्यात 

रत्नागिरी:- बदलते वातावरण, जेलीफिशचा वावर यामुळे त्रस्त झालेल्या मच्छीमारांना गेले दोन दिवस वेगवान वार्‍यांच्या अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मागील दोन आठवडे मच्छीमारांना मासळीच मिळत नाही. अनेक गिलनेटवाले तर बंदरातून बाहेर पडण्यास इच्छुक नसल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.

गेले दोन दिवस मतलई वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे समुद्रात पाण्याला प्रचंड करंट आहे. छोट्या मच्छीमारांना समुद्रात जाण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. एक, दोन सिलिंडरने, फायबर बोटींनी मासेमारी करणारे अनेक मच्छीमार समुद्रात जाण्यास तयार नाहीत. अनेक नौका बंदरातच उभ्या आहेत. जेलीफिश आणि डॉल्फीन मासे गेले दोन महिने कोकण किनारपट्टीवर वारंवार दिसत आहेत. झुंडीने फिरणार्‍या या माशांमुळे मच्छीमारांची जाळी फाटून नुकसान सहन करावे लागते. तसेच दहा वावात मिळणारी मासळीही खोल समुद्राकडे वळते. परिणामी जाळ्यात काहीच मासळी मिळत नाही. मच्छीमारांना नुकसानच सहन करावे लागत आहे. ट्रॉलिंगवाल्यांसह अन्य मच्छीमारांना गेल्या काही दिवसात बांगडी मासा मिळत आहे. त्याला दरही चांगला आहे. पण वार्‍यामुळे मासेमारीवर परिणाम झाला असून खाण्यासाठी वापरणार्‍या माशांची कमतरता आहे. दरही वधारले असून पापलेट, सुरमई सारखा मासा किलोला शंभर रुपयांनी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. हे वातावरण अजुन दोन दिवस राहील असा अंदाज मच्छीमार व्यक्त करत आहेत. मतलई वारे थांबले की आपसुकच मासळी किनारी भागाकडे वळेल अशी आशा मच्छीमारांमध्ये आहे. रविवारी वारे थांबले तर मच्छीमार समुद्रात जातील अशी शक्यता आहे. मिर्‍या, काळबादेवी, कासारवेलीसह आजुबाजूच्या बंदरांवरील शेकडो मच्छीमारांची आर्थिक कोंडी होत आहे.