रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेने कालपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. त्यासाठी १८२३३०९३० हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. पालिकेच्या आरोग्य, विद्युत, बांधकाम, उद्यान विभागाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने या काळात दीर्घ रजेवर जाऊ नये किंवा पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडू नये, असे आदेश मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार माजला. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली. हा अनुभव पाठीशी असल्याने या वेळी जिल्हा प्रशासन सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पूर येणाऱ्या भागामध्ये साधनसामग्री पुरवण्यात आली आहे तर अनेकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा आपत्तीपूर्वी संपूर्ण यंत्रणा सजग झाली आहे. शहरी भागात पालिकांमध्ये १ जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. हा २४ तास सुरू राहणार आहे. कोणतीही घटना घडल्यास मदतीच्यादृष्टीने या नंबरवर कॉल केल्यास यंत्रणा कामाला लागणार आहे.
कालपासून पालिकेचा आरोग्यविभाग, बांधकाम, विद्युत आणि उद्याने विभाग सज्ज झाला आहे. तसेच आपत्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. पावसामध्ये साथरोग पसरू नयेत यासाठी आरोग्य विभाग राबणार आहे. पडझड झाल्यास किंवा गटारे तुंबल्यास तेथे बांधकाम विभागाकडून मदतकार्य केले जाणार आहे. झाडे पडल्यास उद्याने विभाग आपली कटर व अन्य यंत्रणा घेऊन काम करणार आहे. विजेचा खांब पडणे किंवा अन्य काही झाल्यास पालिकेचा विद्युत विभाग तिथे काम करणार आहे. कार्यालयीन प्रमुखांनी या काळात दीर्घ रजेवर जाऊ नये किंवा पूर्वसूचनेशिवाय कार्यालय सोडू नये, असे आदेश मुख्याधिकारी बाबर यांनी दिले आहेत. पालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.