महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे षडयंत्र: विनायक राऊत

रत्नागिरी:- भाजपने आणलेले महिला विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हिताचे नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र होते, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

विनायक राऊत म्हणाले की, “२०२३ मध्ये विधेयक मंजूर झाले असताना पुन्हा ते मांडण्याची गरज काय होती? भाजपला या विधेयकाच्या आडून मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा आपला पक्षीय अजेंडा राबवायचा होता. सध्याच्या खासदार संख्येनुसारच ३३ टक्के आरक्षण द्यायला हवे होते.” प्रियांका चतुर्वेदी यांच्या नाराजीवर बोलताना त्यांनी टोला लगावला की, “त्यांनी कदाचित विधान नीट ऐकले नसेल, पण अभ्यास केल्यावर त्यांनाही समजेल की हे महिला विधेयक नव्हतंच. महिलांना आरक्षण न मिळणे हे दुर्दैवी असून याला भाजपच जबाबदार आहे.”

शेळके अपघात प्रकरणावर बोलताना राऊत यांनी खळबळजनक दावा केला. “हा केवळ अपघात नसून तो घडवून आणलेला घातपात आहे, असे जे म्हटले जाते त्यात तथ्य आहे. अशोक खरात हा तुरुंगातूनही अशा घटना घडवू शकतो. जसे जसे दुवे समोर येतील, तसे अनेक राजकीय नेत्यांचे कारनामे उघड होतील,” असे ते म्हणाले. तसेच, दीपक केसरकर यांना एसआयटी अद्याप का बोलवत नाही? असा सवाल करत त्यांनी यामागे कोणाचा ‘राजकीय वरदहस्त’ आहे, अशी शंकाही उपस्थित केली.

अमृता फडणवीस यांचा दावा आणि ड्रग्जचा विळखा
अमृता फडणवीस यांनी केलेल्या दाव्याचा दाखला देत राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्र ड्रग्जच्या आहारी जात असून पश्चिम महाराष्ट्र ड्रग्जचे हब बनले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गात गोव्यातून येणाऱ्या ड्रग्जवर बंदी घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे, ही लाजिरवाणी बाब आहे,” असे ते म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेचे सदस्य व्हावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी आणि आपण स्वतः केल्याचे राऊत यांनी सांगितले. स्वतःच्या नावाच्या चर्चेवर बोलताना ते म्हणाले की, “पत्रकारांनी माझे नाव आघाडीवर आणले असले तरी, अंतिम निर्णय उद्धव साहेबच घेतील.”

एकनाथ शिंदे यांच्या वरळी महोत्सवाचा समाचार घेताना राऊत यांनी ‘मोर नाचतो म्हणून तुडतुडा नाचतो’ या म्हणीचा वापर करत टोला लगावला. “वरळीत आदित्य ठाकरेंना चॅलेंज देण्यासाठी कितीही महोत्सव केले तरी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. तिथे आमचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिंदे गटात सध्या सुरू असलेल्या अंतर्गत वादावर भाष्य करताना त्यांनी, हा गट एकमेकांच्या ‘उरावर’ बसला असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे म्हटले.