महावितरणच्या ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू

‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे येथे महावितरणच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून झालेल्या अनिकेत परवडी यांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाह्यस्त्रोत सहायक ऑपरेटर साहिल गुरुनाथ मांजरेकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०५ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

​दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पेंडखळे येथील प्रताप सुर्वे यांच्या बागेतील ११ के.व्ही. विद्युत खांबावर अनिकेत शांताराम परवडी (वय ३२, रा. तिठवली) हे काम करत होते. यावेळी त्यांना भीषण विद्युत धक्का (शॉक) बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

आरोपी ऑपरेटर साहिल मांजरेकर याने नाटे फिडरवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी एकाच वेळी वीजपुरवठा बंद केला होता. एका ठिकाणचे काम पूर्ण झाल्यावर, दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच पेंडखळे येथे अनिकेत परवडी हे अजूनही खांबावर काम करत आहेत, याची पूर्ण कल्पना साहिलला होती. वीजप्रवाह चालू केल्यास अनिकेत यांचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असतानाही साहिलने हलगर्जीपणा करून नाटे फिडरचा वीजपुरवठा चालू केला. यामुळे खांबावर काम करणाऱ्या अनिकेत परवडी यांना जोरात शॉक लागला आणि त्यांचा अंत झाला. पोलीस तपासात हे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

​या गंभीर निष्काळजीपणामुळे एका तरुण कर्मचाऱ्याचा जीव गेल्याने राजापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती दिलीप पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी साहिल मांजरेकर (वय २८, रा. राजापूर वरचीपेठ) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.