डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेच्या मार्फत उभारणी
रत्नागिरी:- महिलांचा कृषि शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र कृषि शिक्षण परिषद, पुणे यांनी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेला जिजामाता महिला कृषि महाविद्यालय, मांडकी- पालव, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी येथे मंजूर केले आहे. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातले हे पहिले महिला कृषि महाविद्यालय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मांडकी – पालवण, ता.चिपळूण येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेला हा मान मिळाला आहे.
या शिक्षण संस्थेत अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू असून या संस्थेमध्ये जवळजवळ २५० एकर परिसर आहे. आंबा, काजु, नारळ, पोफळी, भात व इतर लागवड, गांडुळ खत प्रकल्प, पोल्ट्री, डेअरी इत्यादी प्रकल्प सुरू आहेत. ही संस्था कृषि महाविद्यालयातून प्रॅक्टीकल पदवीधर तयार करण्याचे काम मागील २३ वर्षांपासून करत आहे.
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या कल्पनेतून हे महिला कृषि महाविद्यालय मंजूर झाले आहे. भारतातील एकूण शेती करणाऱ्यांपैकी जवळजवळ ७० टक्के महिला शेती करतात. त्यामुळे भविष्यात
कृषि शिक्षण घेतलेल्या महिला शेतीत उतरतील व आधुनिक शेती करतील व उत्पन्नात वाढ होईल, असा
विश्वास आहे. जिजामाता महिला कृषि महाविद्यालय, मांडकी पालवण, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३ २४ करिता विद्यार्थीनींना प्रवेश घेण्याचे आवाहन करत असून या महिला कृषि महाविद्यालयाचा कोड नंबर १९३११ असा आहे. ज्या विद्यार्थीनींनी इतर महाविद्यालयाला प्राधान्यक्रम दिला असेल, तर तो बदलून जिजामाता कृषि महाविद्यालयाला प्राधान्यक्रम देवू शकतात. त्यासाठी मुदतवाढ आहे.
नवीन जिजामाता महिला कृषि महाविद्यालय, मांडकी पालवण, ता.चिपळूण, जि. रत्नागिरी या महिला कृषि महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनीसाठी सुसज्ज वसतीगृह, मेस, खेळाचे मैदान, प्रयोगशाळा, वर्ग खोल्या, सुसज्ज ग्रंथालय, उच्चशिक्षित व तज्ञ प्राध्यापक वर्ग इ. बाबी नियमाप्रमाणे उपलब्ध आहेत. सर्व सोईंनी युक्त असे हे महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय होईल, असा विश्वास डॉ. तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केला आहे.
या जिजामाता महिला कृषि महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी मा. आमदार शेखरजी निकम यांचे सहकार्य मिळाले. तसेच मा. ना. अजितदादा पवार, मा. ना. धनंजय मुंढे, मा. ना. अब्दुल सत्तार, श्री. राजेंद्र देवरे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.