रत्नागिरी:- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबवित देशातील पहिल्या तीन राज्यात स्थान मिळविणार्या महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक आता घसरला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २०२१‚२२ या शैक्षणिक सत्राच्या पीजीआय अहवालात महाराष्ट्र अव्वल स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घरंगळला आहे. असे असले तरीही जिल्हानिहाय जाहीर झालेल्या शिक्षण निर्देशांकात मात्र रत्नागिरी जिल्ह्याला ‘अतिउत्तम’ श्रेणी मिळाली आहे.
देशभरातील शिक्षणाची अवस्था मांडणारा परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स दरवर्षी केंद्र शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर केला जातो. त्यात गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने सतत पहिला किंवा दुसरा क्रमांक पटकावला होता. परंतु आता २०२१‚२२ च्या अहवालात प्रचंड माघारला आहे. राज्यनिहाय अहवालासोबतच केंद्र शासनाने प्रत्येक राज्याचा जिल्हानिहाय शिक्षण निर्देशांकदेखील जाहीर केली आहे.
जिल्हानिहाय अहवाल २०२०‚२१ आणि २०२१‚२२ अशा दोन वर्षांचा जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी यात केवळ चारच जिल्ह्यांना अतिउत्तम श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. तर इतर सर्व जिल्हे उत्तम श्रेणीपर्यंतच पोहोचू शकले आहे. परंतु अतिउत्तम व उत्तम या श्रेणीदेखील भूषणावह नसून त्याआधी दक्ष आणि उत्कृष्ट या दोन श्रेणी एकाही जिल्ह्याला मिळविता आलेली नाही.
विविध राज्यांचा पीजीआय जाहीर करताना एक हजार गुणांसाठी एकंदर ७३ निकषांवर आधारित मूल्यमापन केले जाते. तर जिल्ह्याचा पीजीआय ठरविताना एकंदर ६० गुणांसाठी ८३ निकषांवर आधारित मूल्यमापन केले जाते. यात महाराष्ट्राला एक हजार गुणांपैकी ५८३ गुण मिळाल्याने प्रचेस्ट‚३ म्हणजे सातवी (दक्ष, उत्कर्ष, अतिउत्तम, उत्तम, प्रचेस्ट‚१, प्रचेस्ट‚३ या श्रेणीनंतरची) श्रेणी मिळाली आहे. तर राज्यातील सातारा, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी व पुणे या जिल्ह्यांना २०२० ‚२१ मध्ये ‘अतिउत्तम’ श्रेणी मिळाली.









