रत्नागिरी:- महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या बंडखोर उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात कोणताही थारा दिला जाणार नाही, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महायुतीचा भव्य मेळावा बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युतीचा धर्म आणि शिस्त पाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
सामंत यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे रत्नागिरी जिल्ह्यात स्वागत केले. कोकणातील एक सहकारी जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावर बसलेला आहे, हे आमच्यासाठी आणि कोकणवासियांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने त्यांनी मनापासून कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी स्पष्ट केले की, युती केवळ केली नाही, तर ती टिकली पाहिजे आणि युतीच्या प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतीवर भगवा फडकला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात रत्नागिरीतून केल्याबद्दल त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानले.
रत्नागिरी जिल्ह्याने वंदनीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालत शिवसेना आणि भाजप (कमळ आणि धनुष्य) एकत्र आणले आहे. त्यांनी ‘मी मोठा आहे’ अशा चर्चांना पूर्णविराम देत स्पष्ट केले की, “प्रदेशाध्यक्ष पद आणि भाजपसारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे चव्हाण साहेबांकडे आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांपेक्षा पदानेद आणि मानाने शंभर टक्के रवींद्र चव्हाणच मोठे आहेत. त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये चर्चा करण्याची आवश्यकता नाही.असे श्री. सामंत यांनी सांगितले.
पालकमंत्री सामंत यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना स्थानिक स्वार्थाची भूमिका बाजूला ठेवण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष उमेदवारांना हात जोडून विनंती करताना त्यांनी स्पष्ट केले की, “मलाच मत द्या, बाकी काही नाही केलं तरी चालेल,” अशा पद्धतीची भूमिका महायुतीसाठी घातक ठरू शकते.बंडखोरांना इशारा देताना सामंत म्हणाले, “भाजप शिवसेना एकत्र येऊन आपण सगळे काम करतो, आपला विरोधक कोण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.” त्यांनी थेट बंडखोरांना इशारा दिला.
ज्या ठिकाणी भाजपला त्रास देण्यासाठी म्हणून काही जर फॉर्म उभे केले असतील, तर ते मागे घेण्याची जबाबदारी चव्हाण साहेब आणि माझी आहे.आणि जर कोणी मागे घेतले नाहीत, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल , जो कोणी आमचा पदाधिकारी असू दे, आमच्या कार्यकर्ता असू दे, माझं नाव घेऊन समर्थक म्हणून सांगणारे, यांची गय केली जाणार नाही. जो , माझ्या पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्यानंतर पुढची चार वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांना माझ्याबरोबर संसार करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ बंडखोर कार्यकर्त्यांना पालकमंत्री म्हणून सामंत यांचे सहकार्य मिळणार नाही.
सामंत यांनी कार्यकर्त्यांना विरोधी पक्षाने केंद्र व राज्य नेतृत्वावर केलेल्या टीकेची आठवण करून दिली. आपला विरोधक कोण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांनी आपल्या नेत्यांवर टीका केली,” त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे आणि या सरकारमध्ये शिवसेना सहभागी आहे.
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना आपले मानून काम करण्याचे आवाहन केले: “भाजपच्या कार्यकर्त्यांना असं समजलं पाहिजे की शिवसेना माझी आहे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की भाजपा माझा आहे.” तसेच, त्यांनी महिलांवरील टीका-टिप्पणी टाळून केवळ धोरणे आणि विकासावर बोलण्याचे निर्देश दिले. या एकजुटीतून रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास बदलून एकही नगरसेवकाची जागा विरोधकांना मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









