रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची शहरातील उत्कंठा आता संपुष्टात आली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या महायुतीच्या उमेदवाराचे नाव काल रात्री उशिरा घोषित करण्यात आले असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) शिल्पा सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवानी माने या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीच्या उमेदवार शिल्पा सुर्वे आज सकाळी ११ वाजता नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
अखेर शिल्पा सुर्वे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी शिल्पा सुर्वे आणि महाविकास आघाडीच्या शिवानी सावंत-माने यांच्यात खरी व चुरशीची लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.









