महामार्गावरील अवजड वाहतूक उद्यापासून होणार पुर्ववत

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. उद्या ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे.

गणेशोत्सव काळात रस्त्यांवरील वाढत्या गर्दीमुळे, विशेषतः चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूककोंडी निर्माण होत होती. त्याचा त्रास गणेशभक्तांना व सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत होता. त्यामुळे पोलीस प्रशासनालाही ताण येत होता.

या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. शनिवार ६ सप्टेंबर रोजी ११ दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गणेशोत्सवाची सांगता झाल्याने आता वाहतूक सुरळीत करण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे उद्या रात्रीपासून महामार्गावर अवजड वाहतूक सुरू होणार आहे.