लांजा:- तालुक्यातील कोर्ले फाटा येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका डंपर चालकाने त्याचे वाहन धोकादायक स्थितीत उभे केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. याप्रकरणी लांजा पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०७ एप्रिल २०२५ रोजी रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी कोर्ले फाटा येथे भोलानाथ नंदलाल रसार (वय ३५, सध्या रा. वरची कुंभारवाडी, लांजा, मूळ उत्तर प्रदेश) याने त्याचा आर.जे.१९ जी.जे/५४०१ क्रमांकाचा डंपर रस्त्यात उभा केला होता. हा डंपर महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच लोकांना धोकादायक ठरू शकणाऱ्या स्थितीत लावण्यात आला होता.
पोलिसांनी भोलानाथ रसार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ (सार्वजनिक मार्गावर उपद्रव किंवा अडथळा निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आणि त्याच दिवशी रात्री यापूर्वी एका डंपर चालकावर अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच रात्री दोन डंपर चालक धोकादायकपणे वाहने उभी करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.