महापुरानंतरही साथीच्या रोगाना अटकाव करण्यात यश

आरोग्य यंत्रणेचे यश; छोट्या बाबींच्याही नियोजनावर लक्ष केंद्रीत

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अभूतपुर्व पावसाने चिपळूण सारख्या शहरात गेल्या शंभर वर्षात आला नव्हता एवढा पूर आला. राजापूर शहर व तालुक्यात अतिवृष्टी सुरु झाल्यापासून बारा दिवस पुराचे पाणी घुसत होते. संगमेश्‍वर व परिसरात 2005 च्या पुरापेक्षा अधिक पातळी पाण्याने गाठली. पुरानंतर सातत्याने बारा दिवस आषाढ सरी कोसळल्या. पुराने आणलेला कचरा, चिखल, अशुुध्द पाणी, शहरात साठलेले कचर्‍याचे ढिग यामुळे रोगराईला निमंत्रण ठरलेले होते. कोविडचा धोका डोक्यावर आहेच. अशा आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने सुक्ष्म पातळीवर छोट्या छोट्या गोष्टींचे नियोजन करुन केलेल्या कामामुळे साथीच्या रोगांना अटकाव करण्यास यश मिळवले आहे. कोविडच्या महामारीत ढिसाळ कारभार आणि अपुर्‍या सुविधा यामुळे सतत टीका झालेल्या आरोग्य विभागाने महापुर व त्यानंतरची कामगिरी दखल घेण्याजोगी ठरली आहे.

महापुरानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर चोविस तास साथरोग व पूरनियंत्रण कक्ष कार्यरत केले आहेत. जिल्हृयात ४७ गावांमध्ये आरोग्य कर्मचारी यांची वैद्यकीय 61 उपचार पथके सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेशा औषध साठयांसह सज्ज ठेवला. खेडमधील विस्थापित 108 कुटुंबे व 578 ग्रामस्थ आणि चिपळूण तालुक्यातील 16 कुटुंबे आणि 74 ग्रामस्थ विस्थापित झाली होती. त्याठिकाणी आरोग्य पथकाव्दारे आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या.

वीस वैद्यकिय पथके चिपळूण शहरात, 14 ग्रामीण भागात आणि 4 फिरते आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पुरविण्याच्या कामी कार्यरत आहेत. 4 आरबीएसके पथकातील 7 डॉक्टर्स, 4 एएनएम व 4 औषध निर्माण अधिकारी वाहनासह तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आली. खेड शहरात 5 पथके व ग्रामीण भागात 3 पथके, संगमेश्वरात 13, रत्नागिरीत 6, लांजा 1 व राजापूरमध्ये 9 आरोग्य पथके आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने सर्व त्या आरोग्य सेवा पूरविण्यासाठी अजुनही कार्यरत आहेत. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील 2 डॉक्टर्स व नर्स असलेले पथक एका वाहनासह खेड शहरात पूर पश्चात साथरोग सर्वेक्षणासाठी कार्यरत आहे.

नऊ रुग्णवाहिका चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविण्यात आल्या. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूरेसा औषध साठा देण्यात आला. आरोग्य पथकांमध्ये पुरेसा औषधसाठा, मेडिक्लोर, सर्पदंश लस, ओआरएस उपलब्ध आहे. अतिरिक्त औषधांची मागणी गरजेनुसार करण्यात आली. पूर ओसरल्यानंतर प्रत्येक गावात आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांचेमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्याचा कृती आराखडा तयार करुन तो प्रत्यक्षात आणला. यामध्ये 29 हजाराहून अधिक घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पिण्याच्या पाण्याचे पर्यायी स्त्रोतांचे (विहिर, बोअरवेल) शुध्दीकरण करण्यात येत आहे.  

किटकजन्य, जलजन्य आजाराच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना तत्काळ देण्यात आल्या होत्या. जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा, कामथे ग्रामीण रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे साथरोग प्रतिबंधक किट अद्ययावत ठेवण्यात आली. खेर्डी, वालोपे, पेढे, मिरजोळी (चिपळूण) व पोसरे बौध्दवाडी (खेड) येथे वैद्यकीय पथकांमार्फत पाणी नमुना घेणे, पिण्याच्या पाण्याची ओ.टी. टेस्ट घेणे, कंटेनर सर्वे व डास प्रतिबंधक फवारणी इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

जिल्हयातील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्र दादर व प्राथमिक आरोग्य केंद्र अडरे येथील मालमत्तेचे प्रत्येकी 5 लाखाचे नुकसान झाले. दळवटणे उपकेंद्रात 5 लाख, खेर्डी उपकेंद्रातील 2 लाख मालमत्तेचे नुकसान झाले. नागरी आरोग्य केंद्र चिपळूण येथील मुख्य इमारतीमधील अंदाजे 7 लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्हा रुग्णालय, सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये यांना पूराचा फटका बसलेला नसून सर्व संस्था सुस्थितीत असून तेथे नियमित आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज पाण्याखाली बुडाले असून, पंचनामा करण्यासाठी तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे.

4 हजार 420 घरात औषध फवारणी

पूर परिस्थिती ओसरल्यानंतर योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याने उद्रेकजन्य स्थिती चिपळूण, खेड परिसरात उद्भवली नाही. काही ठिकाणी तापाचे किरकोळ रुग्ण आढळले. त्यांच्यावर तत्काळ उपचारही करण्यता आले. पूरामुळे साचलेल्या चिखलात फिरल्याने लेप्टो, विहिरींच्या अशुध्द पाण्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, हगवणसारख्या तर साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांच्या साथींचा प्रादुर्भाव होत असतो. 4 हजार 420 घरांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. त्यामध्ये 19 हजार 819 ग्रामस्थांचे वास्तव्य होते.