रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होऊन दोन ठिकाणी तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी काल मनसेच्या १४ जणांना वेगवेगळ्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामीनावर सुटका केली.
राज ठाकरे यांच्या पनवेल येथील सभेनंतर जिल्ह्यात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे खानू येथील कार्यालय रात्री काही फोडले. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी पाली येथील जेसीबीची तोडफोड केल्याचा प्रकार पुढे आला आहे. कार्यालयाच्या सिक्युरिटी गार्ड संभाजी सुवारे (रा. खानू, रत्नागिरी) याने दिलेल्या तक्रारानंतर केबिनच्या व कंटेनर ऑफिसच्या खिडकीच्या काचा लाकडी दांडक्याने फोडताना अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओतही नासधूस करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घोषणा देत असल्याचेही दिसत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. तर दुपारी महामार्गावर पाली उभीधोंड येथे रस्त्याचे काम करत असलेल्या जेसीबी मशीनच्या काचा फोडून काहींना पळ काढल्याची दुसरी तक्रार दाखल करण्यात आली. या आधारे पोलिसांनी मनसेच्या १४ जणांवर वेगवेळे दोन्ही गुन्हे दाखल केले. यामध्ये अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहराध्यक्ष (रा. अभ्युदय नगर), अविनाश धोंडू मौंदळकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष (रा. नाचणे रोड रत्नागिरी), रूपेश श्रीकांत चव्हाण (रा. कोकण नगर), राजू शंकर पाचकुडे (रा. नरबे करबुडे), विशाल चव्हाण (रा. भोके), अजिंक्य महादेव केसरकर (रा. धवल कॉम्प्लेक्स), कौस्तुभ विश्वनाथ केळकर (रा. कोडगाव साखरपा, देवरूख), सतीश चंद्रकांत खामकर (रा. गणेश नगर, कुवारबाव), सुशांत काशिनाथ घडशी (रा. काटवाचीवाडी), मनीष विलास पाथरे (रा. काळाचौकी मुंबई), सुनील राजाराम साळवी (रा. नाचणे रोड रत्नागिरी), महेश दत्ताराम घाणेकर (रा. देऊड), महेश गणपत घाणेकट (रा. जाकादेवी), रुपेश मोहन जाधव (रा. कोसुंब, संगमेश्वर, सध्या मारुती मंदिर) आदीचा समावेश आहे. त्यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली.