रत्नागिरी:- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांनी राज्यात अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या मोहिमेत १०० टक्के कामकाज पूर्ण करून राज्यातील पहिल्या तीन क्रमांकांवर रत्नागिरी जिल्ह्यातीलच मतदारसंघांनी बाजी मारली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.
चिपळूण हा विधानसभा मतदारसंघ १०० टक्के कामकाज पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. याशिवाय दापोली हा मतदारसंघ १०० टक्के कामकाज पूर्ण करून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुहागर या मतदारसंघानेही १०० टक्के कामकाज करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्येही पुनर्रिक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ९८.७६ टक्के, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे ९१.३८ टक्के कामकाज आज अखेर पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे आणि प्रशासकीय नियोजनामुळे हे यश साध्य झाले आहे.









