मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

राजापूर:- राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील तुळसुंदे जेटीजवळ एका मच्छीमार बोटीवर काम करणाऱ्या आचारी कामगाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम सखाराम कुळये (वय ६०, रा. वडदहसोळ भू, ता. राजापूर) हे खबर देणारे वजूद आदम बेबजी यांच्या मालकीच्या मच्छीमारी बोटीवर आचारी म्हणून कामाला होते. ही बोट तुळसुंदे जेटीच्या समोरील बाजूस खाडीत नांगरून उभी होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी सिताराम कुळये हे शौचास बोटीच्या कडेला बसले असता, अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाडीच्या पाण्यात पडले. पाण्यात पडल्यामुळे ते बुडाले.

हे लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तत्काळ होडीच्या साहाय्याने त्यांना पाण्यातून बोटीत घेतले आणि तुळसुंदे जेटीवर आणले.

जेटीवर आणले तेव्हा सिताराम कुळये पूर्णपणे बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, जैतापूर येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी ‘अकस्मात मृत्यू अहवाल क्रमांक ३२/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. सिताराम कुळये यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत.