मंडणगड येथे कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास वॅगनार गाडीचा भीषण अपघात झाला.  चालकाचे वॅगनार कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरामध्ये कोसळली. या दुर्घटनेत हर्षदा जोशी (७०, रत्नागिरी) आणि शंकर करमरकर (५०, मुळगाव राजापूर, सध्या दापोली) यांचा जागीच मृत्यू झाला.

धुके आणि अंधारामुळे दृश्यमानता कमी असल्याने वॅगनार कारवरील (MH 08 AX 9589) नियंत्रण सुटले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अपघात एवढा गंभीर होता की गाडीतल्या चार प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रमोद मुकुंद लिमये व प्रमोद लिमये (३५, दोघेही केळशी) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात गाडी रस्त्याच्या कडेला खोल चरामध्ये अडकलेली दिसली. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.

वाहनावरील नियंत्रण सुटण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत असून रस्त्याची परिस्थिती, वाहनाचा वेग आणि तांत्रिक बाबींचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघातातील मृतक रत्नागिरी आणि राजापूर येथील असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.