रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली असून 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. अंतिम प्रभाग निहाय यादी 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. 30 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत उमेदवार आपले अर्ज भरु शकतात. 8 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून अर्जांची छाननी होणार आहे. 13 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. 21 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान मतदान होणार आहे. 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे.









