मँगोनेटच्या माध्यमातून सात वर्षात 7 हजार 943 बागायतदारांची नोंदणी

रत्नागिरी:- हापूस निर्यातीमधून कोकणातील बागायतदाराला फायदा मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या मँगोनेट सुविधे दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत आहेत. गेल्या सात वर्षांमध्ये निर्यात करण्यासाठी ७ हजार ९४३ जणांनी मँगोनेटवर नोंदणी केली आहे. त्यात यंदा नोंदणी केलेल्या ३३५ बागायतदारांचा समावेश आहे.

कोकणच्या हापूसला चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे मँगोनेट सुविधा ग्रेप्सनेटप्रमाणे सुरू केली होती. २०१४ साली याची सुरवात झाली. पणन, कृषी विभागाकडून बागायतदारांमध्ये या योजनेचा प्रसार केला जात आहे. निर्यातीकडील बागायतदारांचा कलही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक देशांच्या निकष वेगवेगळे असून त्यानुसार औषध व खतांचा उपयोग करावा लागतो. निर्यातीवेळीही त्याच धर्तीवर प्रक्रिया करुनच तो त्या देशांकडे पाठवावा लागतो. हे करत असताना संबंधित देशतील तज्ज्ञ निरीक्षकांचे पथक भारतातील शेतकर्‍यांच्या बागांचीही पाहणी करत असते. त्या देशांनी दिलेले निकषानुसार हापूस पाठविण्यासाठी मॅगोंनेट प्रणालीवर बागांची नोंदणी केली जाते. त्यामध्ये बागेत वापरण्यात येणार्‍या औषधांची माहिती नोंद करावी लागते. बागांचे व्यवस्थापन कसे करतात हे नमुद केलेले असते. गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक व्यावसायिक थेट बागायतदारांच्या शिवारापर्यंत पोचले आहेत. त्यामुळे बागायतदारांना जागेवर हापूसची किंमत मिळत आहे. गेल्या तिन वर्षांत मँगोनेटवरील नोंदणीलाही प्रतिसाद मिळत आहे. यंदा वर्षभरात ३३५ जणांनी नोंद केली असून एकुण ७ हजार ९४३ बागायतदार नोंदणीकृत आहेत. दर पाच वर्षांनी हे प्रमाणपत्र नूतनीकरण करावे लागते.