भावाच्या निधनाच्या धक्क्याने बहिणीचा मृत्यू

एकाच दिवशी भावंडांवर अंत्यसंस्कार

खेड:- बंगळुरु येथे राहणाऱ्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून खेड येथे राहणाऱ्या 65 वर्षीय बहिणीला मोठा धक्का बसला. धक्क्यातून सावरता न आल्यामुळे भावामागून बहिणीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील पुष्पा प्रकाश जैन असं मृत्यू झालेल्या बहिणीचे नाव आहे.

पुष्पा प्रकाश जैन या खेड शहरातील ललित ट्रेडर्सचे मालक प्रकाशशेठ जैन यांच्या पत्नी आहेत. पुष्पा यांचे बंधू हे बंगळुरु येथे राहत होते. पुष्पा यांचे बंधू किरण पोखरना यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी पुष्पा यांना शुक्रवारी सकाळच्या सुमारास समजली.

ही बातमी ऐकताच पुष्पा यांना मोठा हादरा बसला. भावाचे निधन झाल्याचं कळताच खेडवरून जैन कुटुंब ट्रेनने गोवा आणि गोव्यावरुन बंगळुरु येथे फ्लाईटने जाणार होते. निघण्याची तयारी सुरु होती त्याच वेळेला ही दुर्दैवी घटना घडली. भावावर पुष्पा यांचा विशेष जीव होता. भावाच्या अकस्मात मृत्यूच्या धक्क्यातून त्या सावरु शकल्या नाहीत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुष्पा यांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रकाश जैन हे खेड येथील जुने व्यापारी आहेत. ते जैन मदारिया साजनान कोंकण महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. मृत्यू झालेल्या पुष्पा जैन या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचे बंधू किरण पोखरना हे बंगळुरु येथील सराफ व्यापारी होते. किरण आणि पुष्पा या दोघा बहीण भावाच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा जैन यांच्या पश्चात पती एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने खेड परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यविधी प्रसंगी खेड येथील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यापार, उद्योग क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.