भाट्ये किनाऱ्यावरील 25 नारळांच्या झाडांचे होणार पुनरुज्जीवन

रत्नागिरी:- समुद्राच्या उधाणाने उपळून पडलेली नारळाची झाडे पुनरुज्जीवीत करण्याचा निर्णय भाट्ये येथील रिसॉर्ट धारकांनी घेतला आहे. बारा वर्षांची ही झाडे जगवण्यासाठी केलेली मेहनत वाया जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा झाडे पुन्हा उभी राहीली आहेत.

चार दिवसांपुर्वी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीच्या लाटांनी भाट्ये किनार्‍यांवरील नारळाची झाडे उध्वस्त केली. खासगी रिसॉर्ट चालकाची सुमारे पस्तीस झाडे बघता बघता खाली कोसळली होती. तेथील आणखीन काही झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत. वाळूमध्ये नारळाच्या झाडांची लागवड करुन ती वाढविण्यासाठी गेली बारा वर्षे प्रयत्न केले होते. पडलेल्या झाडांच्या ठिकाणी ती पुन्हा लागवड करुन ती वाढवणे म्हणजे बराच कालावधी लागणार आहे. त्यावर घेतलेली मेहनतही वाया जाणार होती. हे लक्षात घेऊन रिसॉर्ट चालकाने उपळून पडलेल्या झाडांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येणारा खर्चही करण्याची तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसात जेसीबीने खड्डा खोदुन पडलेली झाडे उभी करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत दहा झाडे पुन्हा उभी राहीली आहेत. अशाप्रकारे पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न अत्यल्प प्रमाणात झाले आहेत.