भाटीमिऱ्या अपघात प्रकरणी ‘त्या’ संशयित दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील भाटीमिऱ्या रस्त्यावर झालेल्या अपघात प्रकरणी त्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व नितीन भोईर (वय २२, रा. कैलासनगर, अंबरनाथ, जि. ठाणे) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १०) सकाळी बाराच्या सुमारास भाटीमिऱ्या-भाटकरवाडी येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अर्थव भोईर हे दुचाकी (क्र. एमएच-०८ बीएच ८४८५) दुचाकीच्या पाठीमागे केशव राजबहाद्दूर कुशवाह (वय २३, रा. सडामिऱ्या खालचा वठार-रत्नागिरी) यास घेऊन रत्नागिरी ते मिऱ्या रस्त्याने जात होता त्याने समोरुन येणारी दुचाकी (क्र. एमएच-०८बीजी ६६६९) व पाठीमागून येणारी दुचाकी (क्र. एमएच-०९ ईएच १९८३) हिला भाटीमिऱ्या-भाटकरवाडी येथे विरुद्ध दिशेला जावून जोरदार धडक दिली. अपघात केला. यामध्ये दुचाकी (क्र. एमएच-०९ ईएच १९८३) वरिल चालक संस्कार सरदार कांडर (वय १९, रा. कन्हेरी ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या मरणाला कारणीभूत झाला. तसेच त्याच्या मागे बसलेले दिग्विजय दिपक पाटील (वय २३, रा. कन्हेरी, पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या दुखापतीस तसेच स्वतःच्या गंभीर दुखापतीस व मागे बसलेले केशव कुशवाह यांच्या दुखापतीस तसेच दुचाकी (क्र. एमएच-०८बीजी ६६६९) वरिल चालक सौ. सुप्रिया सचिन बडवे (वय ५५, रा. जाकिमिऱ्या, रत्नागिरी) यांच्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनल शिवलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.