आगामी लोकसभेसाठी ‘वॉरियर्स’ना देणार विजयाचा कानमंत्र
रत्नागिरी:- भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार 19 रोजी रत्नागिरीत येत असून महाविजय 2024 अंतर्गत संकल्प दौर्यातून ते भाजपच्या ‘वॉरियर्सं’ना मार्गदर्शन करुन आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. यावेळी घर चलो अभियानद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांची मते जाणून घेणार आहेत. यानिमित्ताने रत्नागिरी शहराचे वातावरण भाजपामय झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे गेले दोन दिवस उत्तर रत्नागिरीतून दक्षिण रत्नागिरी असा कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या भेटीगाठी घेत प्रवास करीत आहेत. दि. 18 रोजी रात्री ते रत्नागिरी तालुक्यात प्रवेश करणार आहेत. जयगड येथून ते थेट गणपतीपुळे येथे येऊन स्वयंभू गणेशाचे दर्शन घेणार आहेत. गणेशाचा आशिर्वाद घेऊन, गुरुवारी सकाळी पासून रत्नागिरीचा दौरा सुरु करणार आहेत. सकाळी 10 वा. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात भाजपाच्या निवडक 300 वॉरियर्सना मार्गदर्शन करणार असून आगामी लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते 11 वा. जैन मंदिरात भेट देणार आहेत तर 11.10 वा. राम मंदिरला भेट देणार असून दोन्ही ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहेत. त्यानंतर घर चलो अभियानाला सुरुवात होणार आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन ते जनतेची मते जाणून घेणार आहेत. त्यानंतर 12.45 वा. राणी लक्ष्मीबाई चौकामध्ये कॉर्नर सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेनंतर ते नाणीज येथे नरेंद्रचार्य महाराज यांची भेट घेऊन आशिर्वाद घेणार आहेत. त्यानंतर 2.30 वा. लांजा शहरात त्यांचे आगमन झाल्यावर जोरदार स्वागत करणार आहेत तर राजापूर शहरातही त्यांचे स्वागत केले जाणार असून भाजप कार्यकर्त्यांनी दोन्ही ठिकाणी यासाठी जोरदार तयारी केली आहे. राजापूर येथील स्वागतानंतर ते सायंकाळी सिंधुदुर्गकडे रवाना होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमात रत्नागिरीमध्ये भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी मोठ्या कमानी उभारण्यात आल्या असून, मोठे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. भाजपाचे ध्वजही फडकत असून शहरातील वातावरण भाजपामय झाले आहे.