ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर ट्रकची दुचाकीचा धडक
संगमेश्वर:- ताम्हाने-कोसुंब रस्त्यावर बुधवारी दुपारी दीड वाजता झालेल्या भीषण अपघातात आंबवली गावातील प्रतीक सावंत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. चिरे भरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने त्याच्या मोटारसायकलला धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
या मार्गावर चिरे वाहून नेणाऱ्या ट्रकची नियमितपणे मोठी वाहतूक सुरू असते. हे ट्रक कोणत्याही भीतीशिवाय अत्यंत वेगाने धावत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अपघात घडवलेला ट्रक (MH- 07 -1170) महसूल विभागातून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा असल्याची माहिती समोर आली आहे. या गाड्यांची कागदपत्रे, फिटनेस आणि अवाजवी वेग यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश उरलेला नाही.
दरम्यान, ताम्हने-कोसुंब रस्त्यावर आधीपासूनच खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खराब रस्ते आणि भरधाव वाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि दोषींवर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.









