Wednesday, September 23, 2026
spot_img
Home लांजा भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू

भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू

चालक घटनास्थळावरून पसार

लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव महिंद्रा कारने काम करणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास उड्डाणपुलावरील पिअर क्रमांक ३ जवळ ही घटना घडली. गोपाल मुरमु (वय ४५, रा. द्वारहट्टा, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे मृत मजुराचे नाव आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सीमा इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांच्या देखरेखीखाली गोपाल मुरमु हे लांजा उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम करत होते. याचवेळी महिंद्रा कार क्रमांक केए ०३ एसी ३६०० घेऊन मौला कासम शेख (वय ३८, मूळ रा. अक्कलकोट, सोलापूर, सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) हा उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जात होता. रस्त्यावरील कामाची परिस्थिती व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत त्याने मुरमु यांना जोरदार धडक दिली.

धडकेनंतर गोपाल मुरमु गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमीला मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक राजशेखरन मुरुगन यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक मौला कासम शेख याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेचे चित्रीकरणही करण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५(३) अन्वये आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.