भरणे नाका येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड:- शहराजवळ असलेल्या भरणे नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात घडला. शांताराम गोरीविले (रा. खेड तालुका) आणि त्यांचा सहकारी शांताराम तांबट दुचाकीने जात असताना, पाठीमागून येणाऱ्या ‘कंटेनर’ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार शांताराम गोरीविले हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे दृश्य इतके भयानक होते की, गोरीविले यांचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता.या अपघातात शांताराम तांबट हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरणे नाका परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीतील बेबंदशाहीमुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अपूर्ण आणि अरुंद रस्त्यांमुळे येथे कायम वाहतूक कोंडी होते. तसेच, उड्डाणपुलाखाली वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने वाहने चालवत असतात, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी पोलीस चौकी असूनही, अपघाताच्या वेळी एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे. जर यावर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर भविष्यात अशा अपघातांची मालिका सुरूच राहण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.