भर पावसात आंबा बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रत्नागिरी:- आंबा, काजू व्यावसायिकांना संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध समस्या सोडवण्यासाठी गेली सात वर्ष सातत्याने सरकार दप्तरी खेटे मारुनही काही उपयोग होत नसल्याने हतबल झालेल्या आंबा बागायतदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सरकारी दिरंगाईचा निषेध करताना, जर वेळीच बागायतदारांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. भर पावसात बागायतदारांनी मोर्चा काढत लक्ष वेधून घेतले.

आंबा बागायतदारांनी मागण्यांबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांना निवेदन सादर केले.
शासनाने 1200 कोटी दिल्यास आंबा बागायतदारांचे सर्व प्रश्न धसास लागू शकतात. परंतु आंबा बागायतदारांचे प्रश्न कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त बागायतदारांनी जिल्हाधिकार्‍यांसमोर व्यक्त केली.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सह. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, नंदकुमार मोहीते, सचिन आचरेकर, विकास सावंत, प्रदीप सावंत, मंगेश साळवी, मन्सुर काझी, अमृत पोकळे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश पोतकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. शासकीय धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला संघटक साक्षी रावणंग यांनी आंबा बागायतदारांना पाठिंबा देताना, शासन फक्त शिवरायांचे नाव घेत परंतु त्यांच्या आदर्शाप्रमाणे रयतेची काळजी घेत नसल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष उदय बने म्हणाले की, द्राक्ष दिसतील डाळिंब दिसतील, मोसंबी दिसते, मात्र सरकारला आंबा काय दिसत नाही. आपल्याला वेळ पडली तर आंबा संशोधनासाठी विद्यापीठावर देखील मोर्चा काढावा लागेल. बँकांना देखील माझा प्रश्न आहे की प्रत्येक बँकेने प्रत्येक गावातल्या शेतकर्‍यांसाठी शेतकरी मंडळ स्थापन करायचे आहे. त्यांनी किती गावात शेतकरी मंडळ केले. शेतकरी मंडळांना बँक आणि सामान्य शेतकरी यांच्यातला दुवा म्हणून काम करायचा आहे पण कुठल्याही बँकांनी मंडळ स्थापन केलेली नाहीत. येथील प्रश्न सोडवण्यासाठी एक मंत्री परिषद याठिकाणी झाली पाहिजे.तरच कोकणातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल. आपण केव्हाही कोणत्याही ठिकाणी आंबा उत्पादकांसोबत आंदोलनाला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबा, काजूच्या छोट्यामोठ्या उत्पादकांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,शेतकर्‍यांचे सातबारा उतारे कर्जमुक्त झाले पाहिजेत. फळबागायतदारांच्या विम्याचे निकष बदलले पाहिजेत. आंबा बागायतदारांना कृषीपंपानुसार बिल आले पाहिजे अशी भूमिका बागायतदारांनी व्यक्त केली. आंब्यावर पडणारे रोग याचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापिठाचे केंद्र रत्नागिरीत व्हावे अशी मागणी केली जात आहे, परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी मोठ्या संख्येने आंबा बागायतदार उपस्थित होते.

आंबा बागायतदारांवर अन्याय करणार्‍या सरकारच्या विरोधात बागायतदारांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला भाजपाचे नुतन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भेट देत, यावेळी बागायतदारांचे प्रश्न समजून घेतले. आपण याबाबत बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी बोलून यातून लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले. बागायतदारांनीही राजेश सावंत यांच्या भूमिकेचे कौतुक केले.