बेपत्ता प्रौढाचा जगबुडी नदीत आढळला मृतदेह

खेड:- तालुक्यातील कुडोशी खापरेवाडी येथून तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह जगबुडी नदीपात्रात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​काशीनाथ रामचंद्र झोरे (वय ४८ वर्षे, रा. कुडोशी खापरेवाडी, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. काशीनाथ हे मंगळवार, २० जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. मात्र, दीर्घकाळ लोटूनही ते घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ते न सापडल्याने, त्यांची पत्नी मनीषा काशीनाथ झोरे यांनी खेड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नोंद केली होती.

​शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कुडोशी गवळटेप येथील जगबुडी नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तो मृतदेह बेपत्ता असलेल्या काशीनाथ झोरे यांचाच असल्याची ओळख पटली आहे.

​खेड पोलिसांनी याप्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (एडीआर) नोंद केली आहे. काशीनाथ यांचा मृत्यू नक्की कसा झाला, याचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.