बाजार समिती सभापती पदावर भाजपाचे संदीप सुर्वे बिनविरोध

रत्नागिरीः– जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संचालक संदिप सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संदिप सुर्वे यांच्या रुपाने प्रथमच बाजार समितीवर भाजपाचा सभापती झाला आहे. त्यांच्या निवडीनंतर सहकार पॅनेलच्या सर्व संचालकांनी संदिप सुर्वे यांचे अभिनंदन केले आहे. शासनाच्या नियमानुसार बाजार समितीचे कामकाज चालविणार असल्याचे श्री. सुर्वे यांनी सांगितले. तर भाज्या, फळांच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार बाजार समित्यांना देण्यात यावेत असा प्रस्तावर राज्य शासनाकडे पाठविणार असल्याचे श्री. सुर्वे यांनी सांगितले.

सहकार पॅनेलच्या करारानुसार प्रत्येक पक्षाला एक वर्ष सभापती पद देण्याचे ठरविण्यात आले होते. भाजपाचा एकच संचालक अ-सतानाही संदिप सुर्वे यांना सभापती होण्याचा मान मिळाला आहे. मंत्री ना. नितेश राणे, खासदार नारायणराव राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हा बँका अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या आशिर्वादामुळे आपण सभापती झाल्याचे श्री. सुर्वे यांनी सांगितले.

सभापती म्हणून एक वर्षाच्या कालावधीत काम करताना नियमांना धरुनच कामकाज केले जाईल. मत्स्य व्यावसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून बाजार समितीची उंची वाढण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बाजार समितीला सेसमधून १ कोटी १६ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सध्या बाजार समितीच्या आवारात भाज्यांचा लिलाव होतो. त्यामुळे आम्हाला सेस मिळत आहे. मात्र जे व्यापारी थेट बाजारात जातात त्यांच्याकडून सेस वसूलीचा अधिकार बाजार समितीला नाही.

बाजार समितीमध्ये लिलाव झाल्यानंतर येथे भाज्यांचा दर जाहिर होतो. मात्र प्रत्यक्ष बाजारामध्ये भाज्या पाचपट दराने विकल्या जातात. केंद्र शासनाच्या धोरणानुसार शेतकरी ते थेट ग्राहक असा शेतमाल विक्रिचा निर्णय झाला आहे. शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळून ग्राहकांना स्वस्त भाजी मिळण्याचा शासनाचा हेतू होता. सध्या हा हेतू सफल होताना दिसत नाही. बाजारात विक्री होणाऱ्या भाज्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे बाजारातील भाज्या, फळांच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार बाजार समित्यांना देण्याची मागणी आपण शासनाकडे करणार आहोत. तसा ठराव समितीच्या पहिल्या बैठकीत घेणार असल्याचे श्री. सुर्वे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ना. नितेश राणे बाजार समितीला उत्तम सहकार्य करत आहेत. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व आमदारांनी बाजार समितीला सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. बाजार समितीचे कामकाज चालविण्यासाठी सेस वसूली आवश्यक आहे. शेतकरी, मच्छि व्यावसायिकांनी समितीला सहकार्य करण्याची विनंती श्री. सुर्वे यांनी केली आहे.

संदिप सुर्वे यांच्या निवडीनंतर त्यांचे माजी आमदार राजन साळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे, यांच्यासह उप सभापती श्रीम. स्नेहल सचिन बाईत, श्री. गजानन कमलाकर पाटील, श्री. अरविंद गोविंद आंब्रे, श्री मधुकर दिनकर दळवी, श्री. सुरेश भिकाजी सावंत, श्री. सुरेश मारुती कांबळे, श्री. हेमचंद्र यशवंत माने, श्रीम. स्मिता अनिल दळवी,श्री. विजय वासुदेव टाकले, श्री नैनेश एकनाथ नारकर, श्री. रोहित दिलीप मयेकर, श्री. ओंकार संजय कोलते, श्री. प्रशांत यशवंत शिंदे,सचिव पांडूरंग जयराम कदम यांनी अभिनंदन केले आहे.