‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय यंत्रणा सज्ज

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर पशुवैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोंबड्या किंवा पक्षांवर मरतुकीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची तपासणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नऊ विशेष पथके सज्ज ठेवली आहेत. 

जिल्ह्यात या रोगाचा शिरकाव झालेला नसल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. यतिन पुजारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात महिला बचत गट, तरुण व्यावसायिक यांसह अनेकांकडून पोल्ट्री व्यवसाय चालवला जातो. दिवसाला हजारोच्या कोंबड्यांची विक्री होत असते. लाखो रुपयांची उलाढाल या माध्यमातून सुरू आहे. कोरोनामुळे गतवर्षी मार्च ते मे या कालावधीत मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी पुन्हा बर्ड फ्लूचे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांसह चिकन विक्रेतेही त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्राच्या शेजारील पाच राज्यात थैमान घातले असून महाराष्ट्रात कुठेही या साथीचा प्रादुर्भाव आढळलेला नाही. अचानक मोठ्या प्रमाणात पक्षी मरण्याचे प्रकार या संसर्गात होते. पोल्ट्री व्यवसायासह बाहेरच्या देशातून स्थलांतरित होऊन मोठ्या प्रमाणात पक्षी जिल्ह्यात येतात.

जिल्ह्यात परदेशी व स्थलांतरित पक्षी वास्तव्य करतात. या पक्षांकडूनही बर्ड फ्लूचा प्रसार होण्याच्या शक्यतेमुळे पशू विभागाकडून पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील विविध पशू केंद्रांतर्गत असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. कोंबड्यांवर किंवा पशू-पक्षांवर कोणत्याही प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याची तक्रार आल्यास विशेष पथकाद्वारे उपचार यंत्रणा राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक पथक नेमले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषद पशुधन विकास अधिकारी डॉ. पुजारी यांनी केले आहे.