रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने हा बदल्या होत असून, पात्र ठरलेल्या 1 हजार 473 पैकी 1 हजार 74 जणांनी बदलीसाठी अर्जच दाखल केला नाही. आहे त्याच शाळा पसंत केल्या आहेत. तर 399 गुरूजींना सोयीच्या शाळा पाहिजे आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या तिसर्या टप्प्यात पात्र ठरलेल्या 1 हजार 473 पैकी 399 जणांनी बदल्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. येत्या दोन दिवसात त्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अवघड क्षेत्रातील तीस टक्केहून कमी शिक्षकांनी बदलीसाठी तयारी दर्शविली
आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या विविध कारणांमुळे चर्चेत येत असतात. यंदा ऑनलाईन राबविलेल्या पध्दतीमध्येही काही त्रुटी असल्याचे शिक्षक संघटनांकडून दाखविण्यात आले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर तिसर्या टप्प्यातील प्रक्रिया सुरु आहे. बदल्यांसाठी शाळा विकल्प भरण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. बदली अधिकार पात्र ठरलेल्या म्हणजेच अवघड क्षेत्रात शाळेत सलग दहा वर्षे आणि एकाच शाळेत पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांची यादी तयार केली आहे.
जिल्ह्यात 1 हजार 473 शिक्षक अवघड क्षेत्रात काम करणारे होते. त्यांंना बदलीसाठी शाळा विकल्प भरण्यासाठी मुदत दिली होती. ती संपुष्टात आली असून 399 शिक्षकांनी बदलीसाठी तयारी दर्शविली आहे. एवढ्या कमी प्रमाणात शिक्षक असल्यामुळे यावरुन तर्कवितर्क लढविले जात आहेत.
बदलीसाठी शिक्षक अधिक आणि सहाशेहून कमी शाळा उपलब्ध असल्यामुळे अनेक शिक्षकांना पसंतीची शाळा मिळालेली नाही. त्यामुळे आहे त्याच शाळांमध्ये राहणे बहूतांश शिक्षकांनी पसंत केल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.
बदल्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्षक सेनेकडून शासनाला पत्र लिहिले होते. परंतु प्रक्रियेतील त्रुटी पुढील वर्षी दुरुस्ती करण्यात येईल, असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच काही शिक्षक दुर्गम क्षेत्रातून अन्यत्र जाण्याच्या मानसिकतेत आहेत; पण सेवा ज्येष्ठतेमुळे त्यांना शहरालगतच्या शाळा मिळत नाहीत म्हणून ते अर्ज भरत नाहीत. तरी त्यांना सेवाज्येष्ठता कमी असल्यामुळे शाळा मिळत नाही.