वृद्ध बचावला; बिबट्याचे पुढचे पाय वृद्धाच्या खांद्यावर
रत्नागिरी:- खानू येथील मादी बिबट्याने बछड्याला वाचवण्याच्या उद्देशाने हल्ला केला. बछड्याच्या दिशेने जखमी वृद्ध येत असल्याचे पाहून बिबट्याने हल्ला चढविला. थेट पुढचे दोन्ही पाय जखमीच्या खांद्यावर ठेवून तो हल्ला करत होता. जेव्हा बछडा मागे फिरला तेव्हा जखमीला सोडून बछड्याबरोबर बिबट्या पळून गेला, असे प्रत्येक्षदर्शींनी सांगितल्याची माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.
मनोहर अर्जुन सुवारे (वय ७०,रा. खानू-पाली) असे हल्ला झालेल्या वृद्धाचे नाव आहे. बुधवारी (ता. ६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सूमारास ही घडना घडली. बाजारातून घरी परतत असताना खानू-गोवंडेवाडीकडे जाणाऱ्या पाय वाटेवर बिबट्याने सुवारे यांच्यावर हल्ला केला. ते जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत सुतार म्हणाले, सुवरे बचावासाठी ओरडत असताना काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी हा थरार पाहिला. हल्ला करणारी बिबट्याची मादी होती. सोबत एक बछडा होता. सुवारे त्या बछड्याच्या दिशेने येताना दिसले तेव्हा बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. डोक्यात चावा घेऊन तसेच अनेक ठिकाणी ओरबाडले. बिबट्याने भक्ष्य म्हणून हल्ला केला असता तर त्यांचा गळा धरला असता. परंतु बिबट्या पाठच्या दोन्ही पायावर उभा राहून सुवारे यांच्या खांद्यावर पुढचे पाय ठेवत होता. सुवारे यांनी त्याचे दोन्ही पाय पकडून ठेवले. आरडाओरड सुरू झाल्यानंतर बछड्यानेही दिशा बदलली आणि तो माघारी फिरला. हे पाहून बिबट्याने आहे त्या परिस्थितीत सुवारे यांना सोडून तेथून पळून गेला. यावरून त्याने केलेला हाल्ला हा बछड्याच्या सुरक्षेसाठी केल्याचे दिसते. त्या भागात आतापर्यंत एखाद्या जनावराला, शेळीला बिबट्याने मारल्याचे उदाहरण नाही. परंतु उनाड कुत्री, मुंगुस मारल्याच्या घटना घडल्या आहेत.