रत्नागिरी:-महिलेच्या घरात घुसून धमकाल्याप्रकरणी रत्नागिरीतील ‘त्या’ महिला लोकप्रतिनिधी हिने कोर्टात सरेंडर होणे पत्करले. सरेंडर झालेल्या ‘त्या’ महिलेला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र या प्रकरणात तपास अधिकार्यांना न्यायालयाने नोटीस काढली आहे.
तालुक्यातील नाखरे परिसरात घडलेल्या प्रकारामुळे पावस परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुर्णगड पोलीस स्थानकात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मात्र तक्रारदार महिलेनेे या विरोधात पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली. ज्या पद्धतीने गुन्हा दाखल व्हायला हवा होता, त्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला नाही. आपल्यावर दबाव आणल्याची तक्रारदेखील पीडितेने केली आहे.
तर दुसरीकडे पुर्णगड पोलीस स्थानकात रत्नागिरीतील एका महिला लोकप्रतिनिधी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई झाली नव्हती. मंगळवारी ‘ती’ महिला न्यायालयात सरेंडर झाली. यावर सरकारपक्षातर्फे जामीन मंजूर करण्यास हरकत घेतली. मात्र सर्व कलमं ही जामीनास पात्र असल्याने न्यायालयाने त्या महिलेला जामीन मंजूर केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाने तपास अधिकार्यांनादेखील नोटीस काढली आहे. पुर्णगड पोलिसांनी याप्रकरणात नेमका कोणत्या पद्धतीने तपास केला आणि कशाच्या आधारे गुन्हा दाखल केला, याबाबत आता वरिष्ठ चौकशी होण्याची शक्यता आहे.









