फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात होणार भव्य रोजगार महोत्सव

रत्नागिरी:- बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.  हा पथदर्शी मानून संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व जिल्ह्यांमधून 75  हजार जणांना नोकरी मिळवून देण्याबाबत नियोजन करा असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.

या रोजगार मेळाव्याच्या तारखा व ठिकाण याबाबत आयोजित बैठकीत चर्चा झाली.  जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक झाली याला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्ह्यातून यासाठी किमान दहा हजार विद्यार्थी/विद्यार्थींनींचा सहभाग असून त्यासाठी नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि त्यांना लागणारे मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  या नोकरी महोत्सवासाठी असणाऱ्या सर्व बाबी, ऑनलाईन नोंदणी, प्रत्यक्ष मुलाखतीचे नियोजन याबाबत यावेळी चर्चा झाली.