Friday, September 11, 2026
spot_img
Home सामाजिक फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकाराने चार अंगणवाड्यांचे लोकार्पण

फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकाराने चार अंगणवाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- फिनोलेक्स कंपनीच्या गौरवशाली वर्धापनदिनाचे औचित्य साधत आणि ग्रामीण भागातील चिमुरड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी तालुक्यात अंगणवाडी नूतनीकरणाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गोळप आणि कोळंबे परिसरातील चार अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे लोकार्पण नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून हा समाजोपयोगी उपक्रम साकारण्यात आला आहे.

या टप्प्यात गोळप मोहल्ला (उर्दू माध्यम) अंगणवाडी, तसेच कोळंबे गावानुसार वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या चार अंगणवाड्यांच्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या वा-यांवर आकर्षक रंगकाम, बालकांच्या शिक्षणाला पूरक अशा ज्ञानवर्धक ‘बोलक्या भिंती’, दर्जेदार शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांना आता हवेशीर, स्वच्छ आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय गोळप-दाभिळवाडी आणि कोळंबे-बागवाडी येथील आणखी दोन अंगणवाड्यांच्या नूतनीकरणाचे काम सध्या तिसऱ्या टप्प्यात प्रगतीपथावर आहे.

रत्नागिरी परिसरात या प्रकल्पाच्या तिन्ही टप्प्यांत मिळून आतापर्यंत एकूण १७ अंगणवाड्यांचे नूतनीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. यापूर्वी फणसोप, रनपार, गोळप, पावस आणि कोळंबे परिसरातील १३ अंगणवाड्यांचे रूप पालटून त्या बालकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. बालविकासाची प्राथमिक पायाभरणी करणाऱ्या अंगणवाड्यांना या प्रकल्पामुळे एक नवीन वैभव प्राप्त झाले आहे.

या लोकार्पण सोहळ्याला आकाशवाणी रत्नागिरी–सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विवेक वानखेडे, सुहास नंदुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण व संदीप पाटील, ॲड. गौरव महाजनी व ॲड. रुची महाजनी, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे रामबाबू संका, सागर चिवटे, नंदकुमार शिंपी, अमित घोरपडे, आशिष आठवले तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे शुभम भेगडे, शामराव निंबाळकर, वरद गोरे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय स्थानिक सरपंच, अंगणवाडी सेविका, पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सोहळ्याला उपस्थित होते.

रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकासाला मोठी चालना मिळत असून, ग्रामस्थांमधून या कार्याबद्दल विशेष समाधान व्यक्त होत आहे.