फणसाच्या झाडावरून पडून तरुण गंभीर जखमी 

रत्नागिरी:- वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत फणस खरेदी करण्यासाठी आलेल्या पनवेल येथील तरुण फणसाच्या झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

प्रवीण धीरु बुटीया (वय ३२, रा. पनवेल, जि. रायगड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील संगम रेसिडेन्सी हॉटेलच्या मागील परिसरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण बुटीया व त्यांचे काही मित्र वटपौर्णिमेसाठी फणस विक्री करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत आले होते. रत्नागिरीत आल्यानंतर मंगळवारी सकाळी रेल्वेस्टेशन येथील संगम रेसिडेन्सी हॉटेलच्या मागील परिसरात असलेल्या फणसाचे फणस खरेदी केले होते. त्या फणसाच्या झाडावर सर्व मित्र चढले. त्यामध्ये प्रवीणही होता. पण नुकताच लागून गेलेला पाऊस यामुळे झाड ओले झालेले होते. इतर मित्र झाडावरुन खाली उतरले पण प्रवीण बुटीयाचा झाडावरुन पाय सरकला व तो पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तात्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद कऱण्यात आली आहे.