जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू
संगमेश्वर:- तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथे एका तरुणाने प्रेमप्रकरणातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोहम राजाराम पवार असे त्या तरुणाचे नाव असून, गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रेयसी त्याच्याशी संवाद साधत नसल्याने नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बुधवारी सोहमने विष घेतल्यावर त्याची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला त्याला देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र स्थिती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद देवरूख पोलिस स्थानकात झाली असून, निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.