प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईन प्रक्रियाच 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यासाठी शिक्षकांची सेवेसंदर्भासह वैयक्तिक माहिती संकलनाचे काम गेले महिनाभर राज्यभरात सुरु आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्वात प्रथम 22 जुनला शंभर टक्के माहिती पोर्टलवर भरुन पूर्ण केली. सुमारे पावणेसहा हजार शिक्षक असून तांत्रिक अडचणींवर मात करत केलेल्या कार्यवाहीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी समाधान व्यक्त केले.

ग्रामविकास विभागाकडून बदल्यांच्या प्रक्रियेतील पध्दतीसंदर्भात काही महत्वपूर्ण बदल केले आहेत. शिक्षकांची वैयक्तिक तसेच शासकीय माहिती पोर्टलवर भरावयाची होती. एका जिल्ह्यात दहा वर्षे सेवा पूर्ण, एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण झालेले शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. ग्रामविकास विभागाकडून सर्व शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाकडून सॉफ्टवेअरमध्ये अपडेट केली जात आहे. शिक्षकांना माहिती पडताळणीसाठी संधी दिली जात असून त्यासाठी ओटीपी दिला देत खाते स्वतंत्र केले आहे. जो संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावर दिला जाणार आहे. मोबाईल, आधार, पॅन, ईमेल, युडायस क्रमांक युनिकनेस केले जाणार आहे. ही माहिती शिक्षकांकडून ऑनलाईन खात्री करुन त्याचे फायनल अपडेट करण्याचे काम केले जात आहे.

बदली प्रकियेची माहिती भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून विश्वास काशिद यांची कार्यक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. ते सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक अडचणी वेळोवेळी सोडवत माहिती भरण्याचे काम सुरु होते. बदली पोर्टलवरील अडचणी सोडविण्यासाठी विन्सेन्स कंपनीकडून अधिकारी नियुक्त केले होते. माहिती भरुन झाल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आले असून त्यावर तत्काळ सुनावणी घेण्यात येणार आहे. पोर्टलवर माहिती भरलेल्यांपैकी पात्र ठरणार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याने शंभर टक्के कामगिरी केली असून त्यापाठोपाठ जालना जिल्हा आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शिक्षक म्हणून रुजू झालेली तारीख, मागील बदलीचा तपशील पोर्टलवर भरुन घेण्यात आला आहे. याचा लॉगीन प्रत्येक अधिकार्‍याला दिलेला आहे. ईमेल, मोबाईलवर ओटीपी भरुन लॉगीन करावयाची सुविधा देण्यात आली असून लॉगीन केल्यानंतर यावर माहिती दिसेल. ती बदलण्याची सुविधाही आहे. गटशिक्षणाधिकारी ती माहिती पडताळणी करुन पुढे पाठवतात.