रत्नागिरी:- दानशूर व भक्तीभूषण स्व. भागोजीशेठ कीर यांनी प्रत्येक समाजाचा आदर केला. तोच वारसा आता प्रत्येकाने जपला पाहिजे. रत्नागिरीत जातीधर्मात तेढ निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक समाजाने थोर पुरुषांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. शहरात सध्या पुतळ्यांची संख्या वाढली असून, या पुतळ्यांकडे पाहून प्रत्येकाने त्यांनी दिलेली शिकवण आचारली पाहिजे, स्मारकांच्या माध्यमातून ही शिकवण पुढच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी राहिल असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
स्व. भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्यांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साळवीस्टॉप येथे झाले. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, अखिल भारतीय भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, भंडारी समाज तालुकाध्यक्ष राजू कीर, यांच्यासह सुनील भोंगले, प्रसन्न आंबूलकर, भागोजीशेठ यांचे पणतू आशिष कीर यांच्यासह रत्नागिरीतील विविध समाजातील नामांकीत मंडळी उपस्थित होती.
यावेळी भंडारी समाजाच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेला शब्द पूर्ण केला,त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ना. सामंत यांनी सांगितले. स्व. भागोजीशेठ यांनी ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला त्या गाडगेबाबांचे स्मारकही लवकरच उभारले जाणार आहे. स्व. भागोजीशेठ कीर यांनी ज्या खडतर परिस्थितीतून मुंबईला जाऊन सचोटीने काम केले आणि मोठे विश्व निर्माण केले.÷ त्यांनी सामाजिक जातीभेद केला नाही. त्यांच्या याच गोष्टीचा वारसा प्रत्येकाने पुढे चालवला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना राजू कीर म्हणाले की, पालकमंत्री सामंत यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. पुतळ्यांच्या कामाचा शुभारंभ झाला असून, संपूर्ण भंडारी समाज त्यांचा ऋणी असून, त्यांच्या कायम पाठीशी राहील असेही कीर यांनी सांगितले. स्व. भागोजीशेठ कीर यांनी नरीमन पाँईट, ब्रेब्रॉन स्टेडीयम, स्टेट बँकेची इमारत अशा अनेक गोष्टी बांधल्या ज्या आजही त्यांच्या कामाची साक्ष देत आहेत. नरीमन पाँईटपर्यंतच्या किनार्यावरील बांधकामाची तब्बल 67 वर्षानंतर दुरुस्ती करण्यात आली एवढे भक्कम काम त्यांनी उभारले होते.
यावेळी नवीनचंद्र बांदिवडेकर यांनीही त्यांच्या आठवणी कथन केल्या. स्व. भागोजीशेठ कीर हे दानशूर व्यक्तीमत्व होते. त्यांनी 9 एकर जागा विकत घेऊन हिंदू स्मशानभूमीसाठी दान दिली. याचबरोबर अनेक कार्यात त्यांनी सढळहस्ते दान दिल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथे त्यांच्या पुतळ्याबरोबरच त्यांचे स्मारकही व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे स्मारकही लवकर करण्याचे आश्वासन पालकमंत्री ना. सामंत यांनी शेवटी दिले.