संगमेश्वर तालुकावासियांची मागणी; ३२ ग्रामसेवकांची पदे रिक्त
संगमेश्वर: देशातील प्रत्येक गावाचा विकास झाल्यास, देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. हे सत्य मानावे लागेल. त्यासाठी प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु संगमेश्वर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नसल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास पाहिजे तेवढा होत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी पुढे येत आहेत.
तालुक्यातील लोकसंख्येने लहान असलेली काही गावे ग्रुप ग्रामपंचायतीच्या दावणीला बांधलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा प्रमाणात सुख सुविधा पुरवल्या जात नसल्याची बोंबाबोंब आहे.त्यामुळे केवळ कागदावरचा विकास. विकासकामे व विकास योजनांसाठी खर्ची पडलेल्या निधीचे मोठ मोठे आकडे वाचून दाखवून दिखावा दाखवण्याच्या प्रकाराला पूर्णविराम देण्याची खरी गरज आहे. संगमेश्वर तालुक्यातील १९६ गावे व १२६ ग्रामपंचायत आहेत. तालुक्यासाठी ग्रामसेवक पदाची एकूण ११६ मंजूर पदे असताना ८४ ग्रामसेवक पदे भरलेली असून आजही ३२ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही ग्रामसेवकांना दोन ते तीन ग्रामपंचायतीचा कार्यभार पेळावा लागत आहे.मात्र अतिरिक्त कार्यभार पेळवताना असताना साहजिकच शासनाच्या सर्व योजना प्रभाविपने राबवताना त्यांचीही दमछाक होते.तरीही ते तोंड दाबून निमूटपणे तारेवरची कसरत करून प्रामाणिक कारभार हाकण्याचा प्रयत्न करतात.हे पाहता एक ग्रामपंचायत एक अधिकारी या सूत्राचा अवलंब झाला तर ग्रामीण विकासाला अधिक चालना मिळून विकासाचा वेग वाढू शकतो हे नाकारता येणार नाही. एका गावाकरीता केंद्र, राज्य सरकार आणि इतर अशा जवळपास ११४० योजना आहेत. परंतु कोणत्या गावासाठी कोणती योजना द्यायची, संगमेश्वर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बहुतांशी योजनांची अंमलबजावणी केली जाते. दैनंदिन ग्रामपंचायतीचे कामकाज, ग्रामसभा व मासिक सभा घेणे, गावपातळीवरील बांधकामे, जन्म-मृत्यू नोंद ठेवणे, विविध अभियाने, सामानाची खरेदी यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पार पाडाव्या लागतात. कामाचा एवढा प्रचंड ताण लक्षात घेता एका ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेला आव्हान देण्याचा हा प्रकार सुरू आहे.
चौकट
स्वतंत्र ग्रामसेवकांची नेमणूक आवश्यक
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत अधिनियमान्वये नेमून दिलेली दैनंदिन कामे करावी लागतात. ऐनवेळा आलेली इतर विभागाची कामे करतांना मुळ अभिप्रेत कामांना वेळ देता येत नाही. परिणामी मुळ कामे वेळेवर न झाल्यास वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि इतर विभागांची कामे झाली नाहीत तर अधिकाऱ्यांचा गैरसमज होतो. त्यासाठी मंजूर पद प्रमाणे ग्रामसेवक पदे नियुक्त करून प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतंत्र ग्रामसेवकांची नेमणूक करणे आवश्यक आहे.