आंबा बागांची स्थिती; किटकनाशकांची फवारणी कमी करण्याच्या सूचना
रत्नागिरी:- प्रचंड प्रमाणात आलेल्या मोहोराला फळधारणाच झालेली नाही. जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ही परिस्थिती उद्भवलेली असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. मोहारातून फळधारणा व्हावी यासाठी बागायतदारांनी किटकनाशकांची फवारणी कमी करा अशा सुचना कोकण कृषी विद्यापिठाने एका परिपत्रकाद्वारे केली आहे.
गेले महिनाभर आंबा पिकात मोहोर बाहेर पडण्यास पोषक हवामान होते. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चांगला मोहोर आलेला आहे; परंतु मोहोर आल्यानंतर बरेच दिवस तापमान 15.9 सेंल्सिअसपेक्षा कमी राहिल्यामुळे मोहोरातील संयुक्त फुलांचे प्रमाण कमी होवून नर फुलांचे प्रमाण वाढले आहे. या कालावधीत औषधांची फवारणी करण्यात आल्यामुळे फळधारणा होण्यासाठी बागेतील परागीकरण करणार्या किटकांवर कीटकनाशकाचा परिणाम होत आहे. ते टाळण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी टाळावी. अत्यावश्यक असल्यास फवारणी करावी अशी सुचना विद्यापिठाने केली आहे. फवारणी दुपारच्या सत्रात करावी. तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यामधील परागीकरण वाढविण्यासाठी मोहोर फुललेल्या अवस्थेत असताना सकाळच्या वेळेस सकाळी 9 ते 12 वाजता झाडे हलवून घ्यावीत. फळधारणा झालेल्या झाडावरील मोहोरातील सुकलेली नर फुले दुपारच्या दुपारच्या वेळेस कडक उन्हात झाडून घेतल्यामुळे किड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. कोरडे हवामान आणि तापमानात होणारी वाढ यामुळे झाडाला ताण बसून फळगळीची शक्यता आहे. त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा 100 लिटर पाणी प्रति झाड किंवा 15 दिवसातून एकदा 150 ते 200 लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. फळमाशीपासून आणि प्रखर सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी, डाग विरहीत फळांसाठी, आंबा फळांना कागदी पिशव्यांचे आवरण घालावे. तसेच रक्षक फळमाशी सापळा एकरी दोन या प्रमाणात बागेमध्ये लावावेत. फळ गळ कमी करण्यासाठी आणि प्रत सुधारण्यासाठी 1 टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.









