रत्नागिरी:- पेठ पूर्णगड येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील कब्रस्तानातील पाखाडीवर रज्जाक दर्वेश कुटुंबाने सोलर लाईट यंत्रणा एक वर्षाआधी बसवली होती. ग्रामपंचायतीच्या सोलर लाईट यंत्रणेची आणि बॅटरीची चोरी झाल्यानंतर रात्रीच्या वेळी दफनविधी करण्यासाठी कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी रज्जाक दर्वेश कुटुंबाने स्वखर्चात ही यंत्रणा उभी केली. मात्र ही यंत्रणा पंधरा दिवसांत काढून टाका अशी नोटीस दान कर्त्यालाच वकीलामार्फत बजावण्यात आली आहे.
पूर्णगड येथे पेठ पुर्णगड गावांमधील मजदूर मोहल्ला, सुलतानी मोहल्ला, खोरण मोहल्ला आणि आझाम मोहल्लयामधली मयत इस्मांच्या दफनविधीसाठी कब्रस्तान आहे. पुर्णगड येथील दर्वेश कुटुंबाने कब्रस्तानात पाखाडी जवळ स्वखर्चाने सोलर यंत्रणा एक वर्ष आधी उभी केली होती. रात्रीच्या वेळी कब्रस्तानात जाताना गैरसोय होवू नये आणि समाजसेवा हेतूने हे कार्य करण्यात आले होते. या ठिकाणी ग्रामपंचायतीने सोलार यंत्रणा बसवले होते. मात्र ही यंत्रणा चोरी झाल्यानंतर दर्वेश कुटुंबाने ग्रामस्थांच्या सोयीकरता सोलार यंत्रणा उभी केली.
येथील जमातील मुस्लिमीत पुर्णगड यांच्या नावाने ही मिळकत आहे. पुर्णगड येथील आझाद मोहल्ल्याच्या आशरफ गफार सारंग, कलीमुद्दीन मजीद गावखडकर, मुशताक अली धालवेलकर, मुखतार अ.कादीर मुल्ला व आझमत कमालुद्दीन बांगी या प्रतिनिधींनी वकिलामार्फत दर्वेश कुटुंबाला नोटीस पाठवून पंधरा दिवसात सोलर यंत्रणा काढण्यास सांगितले आहे. सदर मिळकतीमधील जागेचा वापर दर्वेश कुटुंबाने कोणतीही परवानगी अथवा बांधकाम परवानगी न घेता सोलर लाईटचा खांब कब्रस्तानमध्ये उभा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात अनेक लोक अशा प्रकारचे कृत्य करू शकतील व कब्रस्तानचे पावित्र्य व परंपरा यांस त्यामुळे बाधा पोहचणारी आहे.
यामुळे बेकायदेशीरपणे उभारलेला सोलर लाईट पंधरा दिवसात काढून टाका अशी नोटीस दर्वेश कुटुंबाला बजावण्यात आली आहे.









