रत्नागिरी:- राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याला भरीव निधी आणण्यात आपल्याला यश आले आहे. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध झाला आहे. विमानतळाच्या विस्तारीत भूसंपादनासाठी 72 कोटी रु., जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीला 70 कोटींचा निधी देण्याचे अर्थमंत्र्यांनी मान्य केले आहे. रत्नागिरीतील कुवारबाव येथे चार एकरात निर्वाचन भवन उभारण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली आहे. भूसंपादनासाठी 72 कोटी आवश्यक आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसाठी 70 कोटी रुपये राज्य सरकार मंजूर करणार आहे. राज्यातील अद्ययावत इमारत उभारण्याची सूचना ना.पवार यांनी केली असून आराखड्यात त्यांनी सूचवलेले बदल केले जाणार आहेत.
भाट्ये हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. झाडगाव येथे मत्स्यबीज केंद्र, कुवारबाव येथे 4 एकरात निर्वाचन भवन उभारण्याची घोषणा ना.सामंत यांनी केली. या भवनात निवडणुकीसंदर्भातील सर्व कामे एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहेत.
सिंधुरत्न योजनेंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 300 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातून गरजुंना वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत योजनांचे आराखडे तयार केले जाणार आहेत. त्यानंतर अंंमलबजावणी केली जाईल.
मालगुंड येथे 41 एकरात प्राणी संग्रहालय उभारण्याचे निश्चित झाले आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या असून 15 दिवसांत परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालयाला 12 कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. तर संस्कृत उपकेंद्रात उत्तम दर्जाचे सभागृह येणार आहे. रत्नागिरी शहरात सुशोभिकरणाच्या कामाला वेग आला असून मारूतीमंदिरनंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावरकर पुतळा हे चौक सुशोभित केले जातील. त्यानंतर जेलनाका नाका भव्य स्तंभ उभारण्यात येणार असल्याचे ना.सामंत यांनी सांगितले.
मत्स्य व्यवसाय खात्याने नव्याने लागू केलेल्या नियमावलीमुळे पर्ससीन नेट मच्छीमारांसमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. मच्छीमारांच्या विविध संघटनांशी आपण चर्चा केली असून याबाबत आपले मत आपण मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे लेखी स्वरूपात देणार असल्याचे ना.सामंत सांगितले.









