रत्नागिरी:- परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे देखील झाले नसताना आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले. नदी, नाल्यांना आलेले पूर आणि भिंती कोसळून काही नागरिकांचे बळी गेले. त्यातच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले.
याचे परिणाम दिसून आले असून जिल्ह्यात पुन्हा वादळी वातावरण तयार झाले असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.