पाली येथे दुचाकीला अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील पाली पाथरट येथील उभी धोंड येथे शनिवारी रात्री 8 च्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. प्रदीप प्रभाकर धाडवे ( 30, रा.पाथरट,पाली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पाली येथून  प्रदीप धाडवे हा रत्नागिरीच्या दिशेने चालला होता. यावेळी पाली पाथरट उभी धोंड येथे आला असता खड्ड्यात आदळून त्याच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात एवढा मोठा होता की, धाडवे हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. धाडवे याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान मुंबई – गोवा महामार्गवरील पाली ते निवळी दरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली काही महिने झाले सुरुच आहे. या महामार्गावरील खड्ड्यातुन व धुळीतुन प्रवास करतांना एखाद्या वाहन चालक किंवा प्रवाश्यांचे अशा प्रकारचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटूंब उध्वस्त होतेय. या अपघातात झालेल्या मृत्युला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.