Thursday, October 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी पानवल, शीळ धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन

पानवल, शीळ धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन

पालकमंत्री ना. सामंत यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह आसपासच्या ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न वेळेत सुटावा आणि भविष्यातील जलसंकट टाळता यावे, यासाठी पानवल आणि शीळ धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील सहा महिने टिकेल, या केवळ प्रशासकीय अहवालावर पूर्णपणे अवलंबून न राहता, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संभाव्य बाष्पीभवनाचा आधीच हिशोब मांडून पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बाष्पीभवनाचा विचार करून प्रत्यक्ष कृतीवर भर

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी पानवल आणि शीळ धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ कागदी अहवालांवर विसंबून राहिल्यास ऐन उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने आधीच सर्व संभाव्य घटकांचा विचार करून टंचाईवर मात करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘जलजीवन मिशन’च्या कामांसाठी डीपीडीसीमधून विशेष निधी

पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत १० लाखांच्या आतील प्रलंबित कामांसाठी आणि निधीच्या अतिरिक्त १० टक्के तुटवड्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून (DPDC) विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजना वेगाने पूर्ण होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.