विरोधकांचे आक्षेप मान्य; तर ठेकेदावर दंडात्मक कारवाई
रत्नागिरी:-पालिकेच्या शेवटच्या विशेष सभेत शहरातील नळपाणी योजनेच्या कामाला मुदत वाढ देण्यावरुन भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला धोरवर धरले. मुदत वाढ दिली तरीही काम पूर्ण होण्याची शाश्वती ठेकेदार देणार का असा प्रश्नही उपस्थित केला. विरोधकांनी मांडलेले आक्षेप मान्य करत नगराध्यक्ष प्रदिप उर्फ बंड्या साळवी यांनी अटी-शर्थी घालून मुदत वाढ देण्यास मान्यता दिली. तसेच त्या मुदतीत वाढ झाली नाही, तर ठेकेदावर दंडात्मक कारवाई करावी असाही निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
रत्नागिरी पालिकेची विशेष सभा प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये शहर पाणीपुरवठा योजनेचे काम करणार्या अन्वी कन्स्ट्रक्शनला मुदतवाढ देण्यावरुन भाजप नगरसेवक गटनेते समीर तिवरेकर, राजू तोडणकर, मुन्ना चवंडे, सुप्रिया रसाळ यांच्यासह अपक्ष नगरसेवक विकास पाटील यांनी पवित्रा घेतला. नळपाणी योजनेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्त्यांची कामे होणार नाहीत. शहरातील काही भागांमध्ये अजुनही कामे पूर्ण झालेली नाहीत. अन्वी कन्स्ट्रक्शनकडून कामे करण्यासाठी पुरेसे कामगार दिले जात नाहीत. नगरसेवकांची मुदत संपूष्टात येत आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. मुदत वाढवून दिल्याच्या कालावधीत ठेकेदार काम पूर्ण करेलच याची जबाबदारी कोण घेणार आहे. दिड वर्षांपुर्वी काम सुरु होण्यास आठ महिन्यांचा उशिर झाल्यानंतर ठेकेदाराने पालिकेकडून अतिरिक्त निधी मागून घेतला. आता तीन ते चार वेळा मुदत देऊनही ठेकेदार दिरंगाई करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी श्री. तिवरेकर यांनी केली. तर श्री. तोडणकर म्हणाले, काम पूर्ण झालेल्या भागातील पाईपलाईन फुटून पाणी बाहेर पडत आहे. त्यासाठी रस्ता खोदावा लागतोय. एसटी बसस्थानकाच्या खालील काही भागात ही परिस्थिती उद्भवत आहेत. याला ठेकेदार जबाबदार नाही का. पाणी योजनेचे काम केल्यानंतर हायड्रॉलिक तपासणी का केली गेली नाही असा प्रश्नही उपस्थित केला.
आक्रमक झालेल्या सदस्यांना शांत करत नगराध्यक्षांनी संबंधित ठेकेदाराला बोलावून त्याच्याकडून काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र घ्यावे अशी सुचना मुख्याधिकार्यांना केली. नगराध्यक्ष साळवी म्हणाले की आतापर्यंत 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. 2,803 अतिरिक्त जोडण्या द्यावा लागत आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी वेळ लागणार आहे. ठेकेदाराकडून काम करवून घेण्यासाठी पालिकेला संयम बाळगावा लागत आहे. योजना शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला अटी-शर्थी घालूनच 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ द्या.
मुरुगवाड्याला जोडणार्या रस्त्याच्या रुंदीकरण ठरावावरून सत्ताधारी शिवसेनेला भाजप नगरसेवकांनी धारेवर धरले. भाजप गटनेते तिवरेकर म्हणाले, हा रस्ता माझ्या प्रभागातून जात असतानाही याबाबत नगरपालिकेकडून विचारणा झालेली नाही. आम्ही दिलेल्या रस्त्यांची कामे मंजूर होत नाहीत. याकडे नगराध्यक्ष लक्ष देणार का. आम्ही शिवसेनेच्या प्रभागातील एखादं काम सुचवलं तर तो तुमचा प्रभाग नाही असे सांगितले जाते. जसं मुरुगवाड्यातील रस्त्याचे काम प्राधान्याने करायला घेतली जातात, तशी आमचीही कामे झाली पाहीजेत असे ठणकावले. यावर नगराध्यक्ष साळवी यांनी तिवरेकर यांनी सुचवलेल्या रस्त्याचे काम मंजूर झाल्याचे सांगत यावर तोडगा काढला.









