आवक घटली; डझनाला हापूस 400 ते 1200 रुपये
रत्नागिरी:- गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर वाशी येथील बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुडीपाढव्याला फार कमी पेट्या दाखल झाल्या आहेत. रविवारी सुमारे 40 हजार आंब्याच्या पेट्या मार्केटमध्ये आल्या. यामध्ये कोकणातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील 20 हजार पेट्यांचा समावेश आहे. त्यात देवगडमधील सर्वाधिक 60 टक्के, रत्नागिरीतील वीस टक्के आणि रायगड, वेंगुर्ला व बाणकोटमधून उर्वरित वीस टक्के आंबा जातो. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमधून वाशीत सुमारे 7 ते 8 हजार पेट्या आल्या आहेत.
साडेतिन मुहूर्तापैकी एक म्हणून गुढीपाडवा सण ओळखला जातो. गेल्या काही वर्षात कोकणातील बागायतदार व्यावसायीक दृष्टीकोन पाहून आंबा लवकरात लवकर बाजारात आणण्याचे नियोजन करतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्यात बर्यापैकी पेट्या कोकणातून जातात. यंदा वातावरणातील बदलांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना पहिल्या टप्प्यातील उत्पादन अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यांत राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील काही भागातून आंबा वाशीकडे पाठविण्यास सुरवात झाली; परंतु सिंधुदुर्गमधून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात गेल्याचे वाशीतील व्यावसायीकांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये वाशीमध्ये 30 ते 40 हजारच्या दरम्यान आंबा पेटीची आवक होत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटला हापूस दाखल होण्याचे प्रमाण तुलनेने मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर वाया गेल्याने आणि प्रचंड उष्म्याने झालेली कैरी गळती याचा मोठा फटका हापूसच्या उत्पादनाला बसल्याचे सांगण्यात येत आहे. गतवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 60 हजार पेट्या वाशी मार्केटला दाखल झाल्या होत्या. त्याला दरही दिड हजार ते 4 हजार रुपये पाच डझनच्या पेटीवर मिळाला. यावर्षी माल कमी आणि दर अधिक अशी परिस्थिती आहे. पाच डझनाच्या पेटीचा दर सहा ते साडेसहा हजार इतका आहे.









