रत्नागिरी:- अतिवृष्टीमध्ये धरणे ओव्हरफ्लो होतात आणि किनारी भागातील नागरिकांना धोका निर्माण होतो. यासाठी पाटबंधारे विभाकडून जिल्ह्यातील 30 धरणांवर चोविस तास करडी नजर ठेवली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचारी नेमणे शक्य नसल्याने कंत्राटी पध्दतीने सुमारे तीस जणांची पाच महिन्यांसाठी नियुक्ती केली आहे.
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटीचा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पाटबंधारे विभागातर्फे पावसाळ्यात विशेष नियोजन केले जाते. यंदा मे महिन्याच्या मध्यात आलेले तौक्ते वादळ आणि जुनच्या पहिल्याच आठवड्यात अति मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पाटबंधारे विभाग आधीच सतर्क झाला होता. जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही सुरु केली होती. धरणातून विसर्ग होणार्या बाजूल नदी किनारी असलेल्या लोकांना सतर्कत करण्यासाठी सोशल मिडीयासह ग्रामपंचायतींशी संपर्क ठेवण्यात येत आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडील तीस धरणांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकी दोन व्यक्तींची नेमणुक केली आहे. धरणाबरोबरच जगबुडी, वाशिष्ठी, काजळी आणि कोदवली या चार मोठ्या नद्यांच्या पाणी पातळीवरही लक्ष ठेवले आहे. मोठा पाऊस झाल्यावर नद्याची पाणी वाढते आणि धरणे भरुन वाहू लागतात. अशावेळी योग्य वेळी त्याची माहिती लोकांपर्यंत दिली गेली तर त्याचा फायदा होतो. पाटबंधारे कार्यालयांमध्ये पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
तिवरेमुळे पावसाळ्यापुर्वी सर्व धरणांची तपासणी करण्यात आली. 12 धरणांची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील गतवर्षी पूर्ण झाली आहेत. साखरपा, पन्हाळे, बेणी, तेलेवाडी, मालघर, गुहागर, कळवंडे, पणदेरी, पिंपळवाडी, कोंडीवली, निवे सह खेम धरणाचा समावेश आहे. गतवर्षी 10 कोटी रुपयांचा निधी खर्ची करण्यात आला असन यावर्षीसाठी 6 कोटी रुपयांची मागणी केली आहे.









